घरी परत जायचं म्हणून सामानाची आवारा-आवर करत होतो. हे तरी काय घरंच की ! एवढे दिवस याच्याच आसर्याला राहिलो. माहित होतं पहिल्यापासूनच... क्षणाचा मांड आहे, कधीतरी आवरायचाच... पण मन बेटं हळवं झालंच..!
अपरिग्रहाचं वारं ही लागू दिलं नाहीय मी स्वतः ला... किती गोष्टी जमवल्यात् ... आणि आता त्या काही सगळ्या बरोबर नेता येत नाहीयत, तशा त्या नेता येणार नाहीत , हे तेव्हाही माहित होतं पण तरी ...
--------------------------------------------
" हा मेरी मला खूप आवडतो रे, तुझ्या त्या होलेनबेक पेक्षा किती तरी जास्त " मी कारमध्ये बसल्या बसल्या समोरच्या रस्त्याकडे मनभरून बघत म्हणते "बाईसाहेब, आता आपली पुण्यातली गल्ली आठवा " माझ्या उमाळया-उसाश्याना कानाआड़ करत नवरा उच्चारतो. " ती बघ ती आपली आवडती बंगली.आज तिथे काका बागकाम करताना दिसतायत चक्क "...माझं लक्षच नसतं त्याच्या बोलण्याकडे .
घराभोवती फिरणार्या रस्त्यान्शीही किती जोडले जातो आपण...
हिरव्यागार झाडांच्या कुशीत लपलेलं हे घर.....किती जीव लावतंय...
इंडियन ग्रोसरी शॉप मधली मुलगी देखिल गहिवरते.. मी 'आम्ही जातोय' असं आवर्जून सांगितल्यावर .
दोन दिवस मी अगदी वेड्यासारखं वागत राहते. आदिला बिचार्याला कळतंच नाही, आई आपल्याला विनाकारण का रागावतेय सारखी ? आणि सारखी बाहेर कुठे बघत बसते ?
"मला हवीय पण ती ट्यूलिपच्या फुलांची कुण्डी ..." सध्या मला ट्युलिपची फुलं जरा जास्तच आवडायला लागलेली असतात ..."अगं, बँगेत जागा तरी आहे का ? काहीतरीच काय ?" नवरा वैतागतो. त्याच्याशी आजकाल माझं वाट्टेल त्या कारणानी भांडण व्हायला लागलेलं असतं.
इथवर येतानाच्या वाटेतले सारे सुंदर क्षण मनात फेर धरत असतात. ध्यानीमनी नसताना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडलेली असते... जीवाला जीव देणारे मित्र भेटलेले असतात.. त्यांचा निरोप घेणं अवघड झालेलं असतं...
जड़ मनानं मी कपडे आवरत राहते, भांडी-कुंडी जमवत राहते, देऊन टाकायच्या वस्तुंची यादी बनवत राहते.. मलाच कळत नसतं... हे मला काय होतंय...? इथे दहा दहा वर्षं राहणार्या आणि आता दहा वर्षं रहायच्या बेतानं आलेल्या, ज्यांच्याबरोबर परत जाण्यावरुन वाद घातले, त्यांची बाजू मला एकदम खरी वाटायला लागते...
पडीक चेहार्याने घरात फिरणार्या मला बघून नवरा हतबल झालाय, हेही माझ्या लक्षातही येत नाही.
मी अंगणात एकाच ठिकाणी पाचाव्यन्दा झाडू फिरवत असते, तेवढ्यात फोन वाजतो नवरा माझ्या हातात देतो. मी फोन कानाशी लावते आणि तो चिरपरिचित माझ्या कानावर पडतो ..."गायु , केव्हा येतेयस ग ? तुझी फार आठवण येतेय... तू येणार म्हणून इतकं बरं वाटतंय ..." पलीकडून आईचा मायेनं ओथाम्बनारा स्वर मनात शिरत जातो...
'बस झालं, या आता. कधी येताय ? आम्ही भरपूर प्लँन केलेत ट्रेक, गप्पा , पार्ट्या...' मित्र-मैत्रिणींचे मेल्स, स्क्रेप्स यायला लागेलेले आहेत. 'परवा एकटीच पावसात भिजले ....कविता सुचलिए ... तुला ऐकवायचीय कधी येतेयस ?' लाडक्या मैत्रिणीचं आर्जव माझ्या डोळ्यातून हलकेच वाहू लागतं ...
माझं 'ते' घर...माझं स्वतः च ते घर, माझ्या स्वागताला आतूर झालेलं मला दिसू लागतं...
एका क्षणी जाणवतं काय वेडी आहे मी...... माझं सारं आयुष्य मी ज्या वळणावर सोडून आले होते ते वळणंच तर फिरून आलंय पुढ्यात . आणि वाट बघतंय, हे सारे नवे नवे क्षण घेउन येणार्या नव्या माझी ...आणि या क्षणांना पकडून ठेवू म्हटलं तरी आपल्याला थांबता येणारे का त्यांच्यासाठी ?
सोबतीला आपली मायेची माणसं असतील तरंच या प्रवासाला दिशा आहे, अर्थ आहे ... या छोट्याशा मुक्कामातून जे काही हाती लागलंय ते राहिलंच की सदैव आपल्याबरोबर.
सारं आभाळ मोकळं होतं....मी आदिला उचलून घेत म्हणते "काय मग गोडुबा, जायचं ना पुण्याला? आजी आजोबा वाट बघतायत " आईची गाड़ी रुळावर आलेली आदिला कळते. " हो ..आजोबानी माझ्यासाठी गदा आणलीय ना !" तो डोळे मोठ्ठे करत म्हणतो.
"अगं, पण आपण 'मेरी'वर बंगला बांधणार होतो ना?" नवरा मिश्किल हसत उद्गारतो. माझ्या डोळ्यांसमोर मात्र माझी ती गल्ली उभी राहिलेली असते...